अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनासंबंधी दिलासादायक चित्र समोर येत असले तरी अहमदनगर जिल्ह्यात चिंता कायम आहे. सध्या जिल्ह्यात सातत्याने पाचशेच्या आसपास रुग्ण आढळत आहेत.

दुसरी लाट ओसरत असतानाजिल्ह्यांत आजही सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

यात दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ६१ गावांत पूर्णतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र नगर जिल्ह्यात आता नव्याने लावण्यात आलेल्या याच लॉकडाउनमुळे हाल होण्याची मालिका सुरूच राहिली आहे. त्यातही प्रशासनाच्या चुकीच्या आणि ताठर भूमिकेचा फटका बसत आहे.

आमदार निलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे गावात येणारे सर्व रस्ते बंद केल्याने वाहने येऊ शकत नाहीत. त्यामुळे रुग्णाला खांद्यावर घेऊन येण्याची वेळ परिसरातील ग्रामस्थांवर आली. हे चित्र पाहून आता गावातून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या मोठ्या गावातील हे चित्र आहे. रुग्णसंख्या वाढल्याने तेथे कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यासाठी गावात येणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. मात्र, परिसरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर खासगी रुग्णालये याच गावात आहेत. बाहेरून येणारी वाहने गावाबाहेरच अडविली जात आहेत.

त्यामुळे वस्तीवरील लोकांना रुग्णांना खांद्यावर घेऊन यावे लागत आहे. गुरूवारी अशाच एका रुग्णाला खांद्यावरून नेते जात असतानाचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यावरून गावातून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांची तक्रार आहे की, रस्ते बंद करून तेथे पोलिस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

त्यांच्या ताठर भूमिकेमुळे रुग्णांना घेऊन येणारी वाहनेही आत सोडली जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना रुग्णांना खांद्यावर घेऊन यावे लागत आहे. या गावांना कंटेन्मेंट झोनचे नियम लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

त्यामुळे रस्ते बंद करावे लागतात. मात्र, आपतकालीन परिस्थितीसाठी एक रस्ता मोकळा ठेवणे आणि तेथून रुग्णांना प्रवेश देण्याची सोय केली जाते. याची अंलबजावणी करताना गडबड झाल्याने रुग्णांवर ही वेळ ओढावली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रच बंद केलेल्या गावात अडकले असल्याने परिसरासाठी पर्यायी व्यवस्था, त्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करणेही आवश्यक होते. मात्र, याकडेही यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींकडून यासंबंधी सोयीसुविधा करण्याकडे दुर्लक्षच झाल्याचे या चित्रावरून दिसून येते.

कंटेन्मेंट झोन ऐवजी संपूर्ण गाव लॉकडाऊन :-

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहमदनगर शहरात नव्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने नव्या रुग्ण संख्येत रोज वाढ होत आहे.

अनेक गावांत कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा कार्यरत असली तरी, ही उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे, दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेल्या गावांत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जिल्हा प्रशासन साथरोग अधिनियम कायद्यानुसार घेत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जाहीर केले आहे. ज्या ६१ गावांत आजपासून पूर्णतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला तो दहा दिवस, म्हणजे १३ ऑक्टोबर पर्यंत असेल.