अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वाद झाल्याने मामाने भाच्याचा खून केला. हा थरार गड्डीगोदाम येथे शुक्रवारी मध्यरात्री घडला. सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मामाला अटक केली आहे.

अतुल प्रकाश उके (वय ४३, कारदीपुरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दिनेश भगवानदास लोखंडे (४९, गड्डीगोदाम) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल उके हे वाडीतील एका कॉलेजमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी होते.

मामा दिनेश लोखंडे हा पेंटिंगचे काम करतो. दिनेश व त्याची पत्नी पिंकी यांच्यात कौटुंबिक कलहातून सतत वाद होत होते. त्यामुळे ती दोन मुले शुभम आणि बॉबी यांच्यासोबत वेगळी राहत होती. अतुल आणि त्याचा भाऊ राजू हे दोघेही मामी पिंकीला मदत करीत होते. त्यामुळे दोघांचेही पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मामाला होता.

राजूचे मामीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी भाचा राजू हा पत्नीच्या घरून जाताना दिसला. मामाने त्याला अडवून विचारणा केली असता तो कोणतेही उत्तर न देता निघून गेला. त्यामुळे पत्नीचे नक्कीच राजूसोबत अनैतिक संबंध आहेत, असा संशय पक्का मनात बसला.

शुक्रवारी रात्री दिनेशने दारू ढोसली. दहा वाजताच्या सुमारास तो पत्नी पिंकीच्या घरी गेला. त्यावेळी पिंकी एकटीच घरी होती. त्याने राजूशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबत जाब विचारला. त्याने पत्नीशी वाद घालून अश्‍लील शिवीगाळ केली आणि धमकी देऊन निघून गेला. काही मिनीटातच मुलगा शुभम घरी पोहचला.

आईच्या चारीत्र्यावर संशय घेतल्याची माहिती मिळताच त्याने अतुलला फोन केला. ते दोघेही समजूत घालण्यासाठी दिनेशच्या घरी गेले, परंतु तो घरी आढळून आला नाही. मुलगा शुभम आणि भाचा अतुल हे दोघे जण मारण्यासाठी घरी येऊन गेल्याचा समज दिनेशला झाला.

त्यामुळे दिनेशने लोखंडी पाईप हातात घेऊन दोघांचा शोध सुरू केला. रात्री साडेबारा वाजता अतुल घरी जाताना मामा दिनेशला दिसला. त्याने मागून जाऊन अतुलच्या डोक्यावर सपासप वार केले आणि पळून गेला.