अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- पक्षविरोधी कारवाया करीत असल्याच्या आरोपावरून पदावरून निलंबित करण्यात आलेल्या अहमदनगर शहरातील बाळासाहेब भुजबळ यांनीच आता आक्रमक पणा अंगिकारला आहे.

या कारवाई विरोधात आपण श्रेष्ठींकडे दाद मागत असून आठ दिवसांत फेरविचार न झाल्यास मुंबईत पक्ष कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत,’ असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे. अहमदनगर शहरातील ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष असलेल्या भुजबळ यांना दोन दिवसांपासून पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामध्ये त्यांनी राज्याचे महसूलमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांचे नाव न घेता आरोप केले. तर थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावरही भुजबळ यांनी उघड आरोप केले.

भुजबळ म्हणाले कि, ‘प्रदेशाध्यक्षपदी राहिलेल्या या नेत्याने आपल्या नात्यातील मंडळींना पक्षात स्थान देत आपल्यावर अन्याय केला आहे. आपण ओबीसींचा मेळावा घेतल्यापासून आणि एका पदाधिकाऱ्याचा आघाडी धर्माच्या विरोधात काम करण्याचा सल्ला न ऐकल्याने पक्षात त्रास देण्यास सुरवात केली.

त्यातून पुढे ही निलंबनाची कारवाई झाली आहे. ‘मी सुमारे वीस वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठेने काम करीत आहे. मात्र पक्षात ठराविक नेत्यांच्या नातलगांनाच पदे मिळत आहेत. त्यांच्या स्वीय सहायकांनाही पदे दिली जात आहेत. मधल्या काळात आपण एकदा ओबीसींचा मेळावा घेतला. माझ्याकडे ओबीसींच्या संघटननेचे पदही आले.

तेव्हापासून आपल्याला आणखीच डावलेले जाऊ लागले. माझ्याऐवजी किरण काळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. तरीही आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार झालो. मात्र, काळे यांनी आधी तांबे यांची परवानगी घ्या, मगच कार्यालयात या, असे सांगितले.

तांबे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हापासून आम्ही वेगळे कार्यालय थाटून काम पहात आहोत. याला जातीय राजकारणाचाही वास येतो’, असा आरोपही भुजबळ यांनी केला.