अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  जिल्हा परिषदेच्या दोन वर्ग खोल्या जिल्हा परिषदेची जागेवर न बांधता इतर ठिकाणी केल्याने शिक्षण विस्ताराधिकार्‍यासह केंद्रप्रमुखांचे निलंबन करण्यात आले होते.

सदर घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे घडले असून आता या प्रकरणात आणखी दोन जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मंजूर असलेल्या दोन वर्ग खोल्या जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी विनापरवानगी इतरत्र बांधण्यात आल्या.

याप्रकरणी बोधेगाव येथील काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या नंतर शिक्षण विस्ताराधिकारी रामनाथ कराड व केंद्रप्रमुख रामराव ढाकणे यांचे तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे.

या शाळा खोल्या प्रकरणात आणखी दोन अधिकार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये बोधेगावचे ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे व लघु पाटबंधारेचे शाखा अभियंता जयेंद्र जिजासाहेब पट्टे यांचे निलंबन केले आहे.

यामुळे निलंबन केल्या अधिकार्‍यांची संख्या चार झाली आहे. दरम्यान या प्रकरणी बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी तक्रार केली होती. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचा झालेला खर्च निधी वाया गेेला आहे.

निलंबन झाल्यानंतर या कालावधीत तिघांचे मुख्यालय हे नेवासा तालुका करण्यात आले आहे. तर बोधेगाव येथील ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे यांचे मुख्यालय हे कोपऱगाव करण्यात आले आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.