Tata Cars : सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता कार कंपन्या हळूहळू किमती वाढवत आहेत. जीपनंतर आता टाटा मोटर्सनेही आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने त्यांच्या काही निवडक मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमतीत ०.९ टक्के वाढ झाल्याची माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन किंमती 7 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आल्या आहेत.

कोणत्या गाड्या जास्त महागल्या?

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने सफारी, हॅरियर, नेक्सॉन, अल्ट्रोज, टिगोर, टियागो आणि पंच यांच्या किमती वाढवल्या आहेत. सर्वात मोठी वाढ टाटा हॅरियरच्या किमतीत झाली आहे. आता हॅरियर एसयूव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 30,000 रुपये अधिक खर्च करावे लागतील. सफारीबद्दल बोलायचे झाले तर ती आता 20,000 रुपयांनी महाग झाली आहे.

टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या नेक्सॉन SUV बद्दल बोलायचे झाले तर आता या SUV ची किंमत ग्राहकांच्या खिशाला 18,000 रुपये पडणार आहे. टाटाने अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक आणि टिगोर कॉम्पॅक्ट सेडानच्या किमती 10,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचबरोबर कंपनीची सर्वात स्वस्त कार Tiago आता 8,000 रुपयांनी महाग झाली आहे.

टाटाची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही पंचापर्यंत गेली आहे. आता टाटाची पंच एसयूव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 7,000 रुपये अधिक खर्च करावे लागतील. दुसरीकडे, इलेक्ट्रिक कार्सबद्दल बोलायचे तर कंपनीने त्यांच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. Tata Nexon EV, Tigor EV आणि Tiago EV च्या किमती तशाच आहेत.

टाटा मोटर्सने ऑक्टोबरमध्ये त्यांच्या वाहनांची उत्कृष्ट विक्री नोंदवली आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 45,423 प्रवासी वाहने बाजारात विकली आहेत, जी मागील वर्षाच्या तुलनेत 33 टक्के अधिक आहे. एकट्या देशांतर्गत बाजारात कंपनीने 45,217 युनिट्सची विक्री केली आहे. टाटा मोटर्सने सप्टेंबर 2022 मध्ये 47,654 वाहनांची विक्री केली, जी ऑक्टोबरमध्ये 5 टक्क्यांनी घसरली.

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात 4,277 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री नोंदवली, जी मागील वर्षी याच कालावधीत विकल्या गेलेल्या 1,660 युनिटच्या तुलनेत 158 टक्के जास्त आहे.