Agriculture Jugaad:- शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञान, विविध पिकपद्धती आणि शेतीची पूर्व मशागत, आतर मशागती पासून तर थेट पीक कापणी पर्यंत अनेक प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. कृषी यांत्रिकीकरण आता मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे यंत्रांचा वापर होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे व शेतीची कामे अगदी वेळेत पूर्ण होत असल्यामुळे त्याचा हातभार हा उत्पादन वाढीला लागताना दिसून येत आहे आणि छोटी मोठी यंत्रे आता विविध कामांसाठी वापरली जातात व यामुळे खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसतो.
जर शेती कामाचा विचार केला तर प्रामुख्याने पीक लागवडीनंतर पिकांची आंतरमशागत, तण नियंत्रण आणि पिकांची काढणी म्हणजेच उभ्या पिकांची कापणी ही कामे खूप वेळखाऊ आणि खर्चिक असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा खूप वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून याकरिता ब्रश कटर हे एक शेती कामासाठी उपयोगी पडणारे असे एक यंत्र असून अगदी छोट्या ते मोठे शेतकऱ्यांपर्यंत हे यंत्र खूप फायदेशीर आहे. याच बहुउपयोगी यंत्राची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
ब्रश कटर आहे एक बहुउपयोगी शेती यंत्र
छोट्या शेतकऱ्यांपासून ते अगदी मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना शेतीच्या विविध कामांमध्ये उपयुक्त पडेल असे ब्रश कटर हे एक महत्त्वाचे यंत्र असून या यंत्राच्या साह्याने गवत तसेच चारा व पीक कापणी आरामात करता येऊ शकते. तसेच या यंत्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत दोन ते तीन वेगवेगळी जोडणी यंत्रे देण्यात आलेले आहेत व त्यामुळे ब्रश कटरचा वापर करून तुम्ही पिकांची आंतरमशागत देखील अगदी आरामात करू शकतात.
साधारणपणे चार प्रमुख भागांमध्ये या यंत्राची विभागणी करण्यात आलेली असून ते भाग म्हणजे शाफ्ट पाईप, हँडल, यंत्राचे इंजिन आणि कटिंग युनिट असे ते चार भाग आहेत. बाजारामध्ये साधारण पणे दोन प्रकारचे ब्रश कटर आपल्याला मिळतात. यातील पहिला प्रकार पाहिला तर हे ब्रश कटर मनुष्याच्या उजव्या खांद्यावर एका पट्ट्याच्या म्हणजेच बेल्टच्या माध्यमातून अडकवून आपल्याला हवे ते काम या यंत्राच्या माध्यमातून करता येते.
तसेच दुसरा प्रकार म्हणजे हे यंत्र पाठीवर व्यवस्थित बसवून किंवा पाठीवर घेऊन आपल्याला काम करता येते. अगदी फवारणी पंप जसा आपण पाठीवर अडकवतो किंवा पाठीवर त्याला सेट करतो अगदी त्याचप्रमाणे ब्रश कटर देखील सेट करून आपल्याला शेतातील विविध कामे करता येतात. हे यंत्र दोन स्ट्रोक आणि चार स्ट्रोक अशा दोन प्रकारच्या इंजिन मॉडेलमध्ये सध्या उपलब्ध आहे. शेतामध्ये वाढलेले गवत कापण्याकरिता नायलॉन दोरीचा वापर करून ब्रश कटरचा वापर करता येतो.
ब्रश कटर जास्तीत जास्त उपयुक्त व्हावे याकरिता त्याला वेगवेगळ्या गोलाकार दातेरी असे ब्लेड फिट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे व या ब्लेडचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यानुसार ब्रश कटरचा आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी वापर करता येतो.उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला जर भात किंवा गहू कापणी करायची असेल तर याकरिता तुम्ही जास्त दाते असलेली म्हणजे जास्त दातेरी असलेले ब्लेड वापरू शकतात.
तसेच तुम्हाला शेतामध्ये किंवा बांधावर जास्त वाढलेले गवत कापायचे असेल तर त्याकरिता दोन किंवा तीन दातेरी असलेल्या ब्लेडचा वापर करता येतो. तसेच या यंत्रासोबत दोन ते तीन प्रकारची वेगवेगळी जोडणी यंत्र दिलेली आहेत. यामध्ये दोन छोटे टिलर असून एका टिलर ला इंग्रजी एल आकाराचे ब्लेड आहे तर दुसऱ्या टिलर ला आडवे ब्लेड गोलाकार पद्धतीने जोडलेले आहे.
या टिलरचा उपयोग करून तुम्ही शेतीची बरोबर मशागत करू शकतात किंवा पिकांमध्ये जर तण झाले असेल तर मुळासकट तण काढण्यासाठी देखील याचा तुम्ही वापर करू शकता. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या ब्रश कटर मशीनला तुम्हाला करवत देखील जोडता येते व या करवतीचा उपयोग करून तुम्ही बांधावरील झाडांच्या ज्या काही जास्त वाढलेल्या फांद्या आहेत त्या काढण्यासाठी करू शकतात.
या पद्धतीने ब्रश कटर मशीन अनेक वेगवेगळ्या कामांसाठी खूप उपयुक्त असून शेतकरी बंधू याचा फायदा घेऊन वेळेत कामे पूर्ण करू शकतात.