टेक्नोलाॅजी

Bullet Tractor: कमीत कमी डिझेलमध्ये बुलेट ट्रॅक्टर करेल शेतात जास्तीत जास्त काम! वाचा या बुलेट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Bullet Tractor:- शेतीमध्ये आता यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे शेती कामांसाठी अनेक यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. या कृषी यंत्रांमध्ये शेतकरी सर्वात जास्त प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करतात. कारण शेतीच्या पूर्व मशागती पासून तर पिके काढणीपर्यंतची अनेक कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्ण केली जातात.

तसेच शेतीची अनेक अवजारे हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे देखिल ट्रॅक्टर चे महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घेणे शक्य नसते. कारण ट्रॅक्टरची किंमत काही लाखात असल्याने अनेक लहान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे परवडत नाही.

परंतु आता काळजी करण्याची गरज नसून लातूर जिल्ह्यातील मकबूल शेख यांनी छोट्याशा अशा बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली असून गेल्या चार वर्षापासून ते अशा पद्धतीचे ट्रॅक्टर तयार करून विक्री करत आहेत. याच बुलेट ट्रॅक्टरची माहिती या लेखात आपण बघू.

 लातूरचे मकबूल शेख यांनी केली बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर जिल्ह्यातील मकबूल शेख हे गेल्या चार वर्षापासून बुलेट ट्रॅक्टर ची निर्मिती करत असून ते शेतकऱ्यांची गरज पाहून बुलेट ट्रॅक्टर तयार करून देत आहेत.

मकबूल शेख यांची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहिली तर ते टू व्हीलर मेकॅनिक असून गेल्या चार वर्षापासून ते ऑर्डर प्रमाणे शेतकऱ्यांना बुलेट ट्रॅक्टर बनवून देतात. एवढेच नाही तर विविध कृषी प्रदर्शन मध्ये देखील ते ट्रॅक्टर ठेवत असल्याचे दिसून येत आहे.

 काय आहेत या बुलेट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?

या बुलेट ट्रॅक्टर च्या माध्यमातून शेतीमध्ये मशागत, विविध पिकांची पेरणी, वखरणी, पिकांना फवारणी तसेच उसासारख्या पिकाला माती लावणे, रोटावेटर तसेच ट्रॉलीतून विविध शेतीमालाची वाहतूक करणे अशी बरीच कामे या माध्यमातून करता येतात. विशेष म्हणजे वीस फूट क्षेत्रामध्ये पिकांवर फवारणी करण्याचे काम देखील या ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येते.

या ट्रॅक्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा या बुलेट ट्रॅक्टरला खूप कमी प्रमाणामध्ये इंधनाची आवश्यकता असते. म्हणजेच कमीत कमी इंधनांमध्ये जास्तीत जास्त काम या ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्ण होते. साधारणपणे हा ट्रॅक्टर एक लिटर डिझेल मध्ये सव्वा ते दीड तास सलगपणे काम करू शकतो.

म्हणजे एक एकर क्षेत्रासाठी काम करण्याला त्याला फक्त एक लिटर डिझेल लागते. हे एक तीन चाकी ट्रॅक्टर असून त्याला दहा एचपीची इंजन देण्यात आलेले आहे. हे पावरफुल ट्रॅक्टर असून कमी इंधनांमध्ये जास्त काम करत असल्याने साहजिकच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास  या माध्यमातून मदत होणार आहे.

Ajay Patil