Nothing 4 Lunch Date : नथिंग कंपनी 4 मार्च 2025 रोजी आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीच्या सह-संस्थापक कार्ल पेई यांनी यापूर्वी सांगितलं होत की, नथिंग फोन (3) 2025 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च केला जाईल. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या टीझरमुळे नथिंग कंपनी एका नवीन डिव्हाइसच्या लॉन्चसाठी तयार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नथिंगने त्यांच्या X प्लॅटफॉर्मवरून 4 मार्च रोजी सकाळी 10:00 GMT / दुपारी 3:30 वाजता (IST) लॉन्च होणार असल्याची घोषणा केली आहे. टीझरमधील फोटोवरून, डिव्हाइसच्या डिझाईनचा काही भाग स्पष्ट होतो. या डिव्हाइसच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असल्याचे दिसते. या डिझाईनमुळे, फोनमध्ये प्रगत फोटोग्राफी क्षमतांचा समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हा नथिंग फोन (3) असेल की एक नवीन प्रकारचे डिव्हाइस, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लीक झालेल्या एका ईमेलमधून असे संकेत मिळाले होते की, नथिंग 2025 च्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, मात्र तो फोन (3) नसेल. मार्च हा तिमाहीचा शेवटचा महिना असल्यामुळे, या टीझरमधून नवीन डिव्हाइसचे संकेत मिळत आहेत.
गीकबेंचवरील अलीकडील लिस्टिंगनुसार, जर हा डिव्हाइस नथिंग फोन (3) असेल, तर तो Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज असण्याची शक्यता आहे. लिस्टिंगमध्ये डिव्हाइस 8GB RAM सह दाखवले आहे, ज्याचा सिंगल-कोर स्कोअर 1,149 आणि मल्टी-कोर स्कोअर 2,813 आहे. हा डिव्हाइस Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करू शकतो आणि त्यात 6.5-इंचाचा OLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
फोन (3) ची किंमत सुमारे $600 (अंदाजे ₹50,000) पासून सुरू होऊ शकते. मात्र, या लॉन्चसाठी नथिंग फोन (3A) सारखा दुसरा पर्याय असण्याचीही शक्यता आहे. टिपस्टर अभिषेक यादव यांनी दावा केला आहे की, नथिंग कंपनी नथिंग फोन (3A) लवकर लॉन्च करून त्यांच्या फ्लॅगशिप लॉन्चच्या टाइमलाइनमध्ये बदल करू शकते.
2023 मध्ये नथिंगने फोन (2) सादर करून स्मार्टफोन क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या अनोख्या डिझाइन आणि Glyph Interface मुळे नथिंगने ग्राहकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे, 4 मार्चला होणाऱ्या या लॉन्चसाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
लॉन्च होणाऱ्या डिव्हाइसच्या डिझाइन, सॉफ्टवेअर, आणि इतर इनोव्हेशनवर सध्या कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. मात्र, नथिंग नेहमीच आपल्या अनोख्या तंत्रज्ञानामुळे चर्चेत राहिली आहे. त्यामुळे, 4 मार्च 2025 रोजी होणाऱ्या लॉन्चमध्ये कंपनी ग्राहकांसाठी नवीन आणि रोमांचक काहीतरी घेऊन येईल, अशी अपेक्षा आहे.