टेक्नोलाॅजी

तुमच्या शेताच्या 40 किलोमीटर अंतरावर वीज पडण्याची शक्यता असेल तर तुम्हाला लागलीच कळेल; सरकारचे ‘हे’ ॲप करेल मदत

Published by
Ajay Patil

अवकाळी पाऊस आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही पाऊस पडतो तेव्हा प्रचंड प्रमाणात विजांचा कडकडाट होत असतो व खास करून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज कोसळण्याच्या घटना घडतात व मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते.

जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रत्येक वर्षाला 2000 पेक्षा जास्त मृत्यू हे वीज पडल्यामुळे होतात. कारण शेतामध्ये काम करत असताना जेव्हा अचानकपणे पावसाला सुरुवात होते तेव्हा आपल्याला कुठे कोणत्या वेळी वीज कोसळेल याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही किंवा शाश्वती नसते.

यामध्ये बऱ्याचदा व्यक्तीच्या चुकाच वीज कोसळण्याला किंवा विजेमुळे मृत्यू होण्याला कारणीभूत ठरतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून जर तुम्ही शेतात काम करत आहात व शेताच्या 40 किमी अंतरावर वीज पडण्याची शक्यता असेल तर तुम्हाला आता सरकारच्या ‘दामिनी’ या मोबाईलच्या माध्यमातून कळु शकणार आहे.

 अशा पद्धतीने कळेल तुम्हाला तुमच्या भागात वीज पडेल की नाही

1- याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून दामिनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. या एप्लीकेशनचे नाव Damini:Lightning Alert असे आहे.

2- हे एप्लीकेशन तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमची प्राथमिक माहिती भरावी लागेल. म्हणजेच तुम्हाला तुमचे नाव तसेच मोबाईल नंबर, राहण्याचा पत्ता तसेच पिन कोड व तुम्ही कुठला व्यवसाय करतात याबद्दलची माहिती भरणे गरजेचे आहे.

3- तसेच या एप्लीकेशनमध्ये येणाऱ्या सूचना तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये हवे आहेत त्या भाषेची निवड करणे गरजेचे आहे.

4- त्यानंतर तुम्ही कोणत्या भागात राहतात याची माहिती देण्यासाठी जीपीएस सेटिंग मधून परवानगी घ्यावी लागेल.

5- त्यानंतर तुम्हाला एक हिरवी किंवा लाल स्क्रीन दिसेल व याचा अर्थ तुम्ही राहता त्या भागाच्या 40 किमी अंतरावर कोणता विजेचा धोका आहे किंवा नाही हे यावरून तुम्हाला कळते. जर लाल स्क्रीन दिसत असेल तर तुमच्या भागात वीज पडू शकते किंवा वीज पडण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ होतो.

6- जर वीज पडण्याची शक्यता असेल तर अशा परिस्थितीत स्वतःला कसे वाचवायचे याबद्दलची माहिती आणि महत्त्वाच्या सूचना देखील यामध्ये देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे आता या परिस्थितीत प्रत्येकाने हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून घेणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारचे आवाहन हे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.

Ajay Patil