Agri Machinery:- सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर होऊ लागला असून शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड ते अंतर मशागत आणि पिकांच्या काढणीपर्यंत उपयुक्त ठरतील अशी यंत्रे कृषी क्षेत्राकरिता विकसित करण्यात आलेली आहेत.
साहजिकच यंत्रांच्या वापराने आता शेतीतील कामे वेगात आणि कमी खर्चात करता येणे शेतकऱ्यांना शक्य झाले असून यामुळे शेतकऱ्यांची पैशांची बचत व्हायला देखील मदत झालेली आहे.
शेतीला उपयुक्त ठरणाऱ्या यंत्रांपैकी जर आपण भात, बाजरी, भुईमूग, गहू, मका, बटाटे, सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांच्या पेरणी किंवा लागवडी करिता उपयुक्त ठरणाऱ्या सीड ड्रिल मशीनच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हे मशीन शेतकऱ्यांना खूप उपयुक्त आहे.
पिकांच्या पेरणी करिता उपयुक्त ठरेल सीड ड्रिल मशीन
हे एक शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असे कृषी यंत्र असून पिकांच्या पेरणीकरिता याचा प्रामुख्याने शेतीत वापर केला जातो. जर शेतकऱ्यांनी सीड ड्रिल मशीनच्या साह्याने पेरणी केली तर ती एकसमान पद्धतीने होते व एका विशिष्ट खोलीमध्ये बियाणे जमिनीमध्ये टाकले जाते.
एवढेच नाही तर बियाण्यावर माती झाकण्यासाठी चे महत्वाचे काम देखील या यंत्राच्या माध्यमातून पार पडते. सीड ड्रिल मशीनच्या साह्याने बाजरी, भात, भुईमूग, गहू, मका, वाटाणे, सोयाबीन, बटाटा तसेच कापसा सारख्या पिकांची सहजरित्या पेरणी करता येते.या यंत्राच्या साह्याने पेरणी केल्याचा एक फायदा म्हणजे बियाण्याची फूट तूट होत नाही
एक सारख्या अंतरात पेरणी करता येते. तसेच बियाण्यांची पेरणी किंवा लागवड झाल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने माती देखील बियाण्यावर पसरवता येते. याव्यतिरिक्त सीड ड्रिल मशीनच्या माध्यमातून पिकांना खत देखील देता येते.
किती आहे या यंत्राची किंमत?
हे मशीन दोन प्रकारचे येते व यातील पहिला प्रकार म्हणजे मॅन्युअल सीड ड्रिल मशीन आणि दुसरा म्हणजे ऑटोमॅटिक सीड ड्रिल मशीन होय. यामध्ये ऑटोमॅटिक सीडी ड्रिल मशीन घ्यायचे असेल तर त्याची किंमत 50 हजार ते दीड लाख रुपये पर्यंत असू शकते व त्या तुलनेत मात्र मॅन्युअल सीड ड्रिल मशीनची किंमत कमी असते. मॅन्युअल सीड ड्रिल मशीनची किंमत अंदाजे 40 ते 90 हजार रुपये पर्यंत असते.