सध्या संपूर्ण देशामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत असून कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. राज्यात देखील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळीस अंशाच्या पार गेले असल्यामुळे सगळीकडे उकाडा जाणवत आहे.
त्यामुळे या प्रचंड प्रमाणात असलेल्या उष्णतेपासून स्वतःच्या बचाव करण्यासाठी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर फॅन, कुलर आणि एअर कंडिशन म्हणजेच एसी इत्यादी उपकरणाचा वापर वाढतो. साहजिकच हे सगळे उपकरणे विजेवर चालणारे असल्यामुळे जास्त वीज बिलाचा फटका आपल्याला बसण्याची शक्यता असते.
त्यातल्या त्यात घरात जर एसी असेल तर मात्र विजबिल जास्त येते. त्यामुळे तुम्ही देखील घरामध्ये एसीचा वापर करत असाल तर कमीत कमी वीज बिल येण्यासाठी काही टिप्स वापरणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील व या टिप्स आपण या लेखात बघणार आहोत.
या टिप्स वापरा आणि एसीमुळे येणारे जास्तीचे विजबिल नियंत्रणात आणा
1- एसीचे तापमान– आपण ऐकलं असेल की एसीचे तापमान कमी ठेवले की अधिक गारवा मिळतो. परंतु याबद्दल जर आपण द ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी कडून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला तर त्यानुसार जर एसीचे तापमान 24°c ठेवून जर त्याचा वापर केला तर ते फायद्याचे ठरते.
कारण आपल्या शरीराच्या तापमानासाठी एसी याच तापमानावर ठेवणे गरजेचे आहे. जर एसी एक युनिटने कमी केला तर विजेचा वापर सहा टक्क्यांनी वाढतो व त्यामुळे हे टाळण्यासाठी 24° ठेवून घरामध्ये चांगला गारवा निर्माण करता येतो.
2- एसीचा कंडेन्सर– आपल्याला माहित आहे की एसीचा कंडेन्सर घराबाहेर बसवतात. साधारणपणे अशाप्रकारे जर एसीचा विंडो एअर कंडिशनर असो किंवा स्प्लिट एअर कंडिशनर असो अशाप्रकारे बाहेर बसवल्यामुळे त्यात धूळ साचते व फिल्टर खराब होऊ शकते.
अशामुळे एसी पुरेशा कार्यक्षमतेने काम करत नाही व विजेचा वापर जास्त करतो. त्यामुळे विजेचा खर्च वाचवायचा असेल व घरातील हवा देखील चांगली ठेवायची असेल तर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे.
3- घरातील सिलिंग फॅन सुरू ठेवणे– घरामध्ये चांगली खेळती हवा ठेवायची असेल व एसीच्या माध्यमातून होणाऱ्या कुलिंगचा स्पीड वाढवायचा असेल तर घरातील सिलिंग फॅन चालू ठेवणे हा एक पर्याय चांगला ठरतो. त्यामुळे संपूर्ण रूम एका वेळेस थंड व्हायला मदत होते. तसेच हवेचा प्रवाह घरामध्ये चांगला राहून खोलीचे तापमान नियंत्रणात राहते. त्यामुळे आरामदायी वाटण्यासाठी आणि जास्तीची हवा खेळती राहावी याकरिता हा उपाय चांगला आहे. त्यामुळे देखील विज बिल कमी येते.
4- घराच्या दरवाजा व खिडक्या बंद ठेवणे– एसी मधून येणारा गारवा जास्त वेळ टिकावा याकरिता रूमचा दरवाजे तसेच खिडक्या पूर्ण बंद करून घेणे गरजेचे आहे. खोलीमधील गारावा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. जर एसी सुरू आहे
व खिडकी किंवा दरवाजे उघडे असतील तर एसीचा थंडावा बाहेर जाऊन रूम थंड होण्यासाठी जास्त वेळ लागतो व त्यामुळे विजेचे बिल जास्त येते. कारण खिडक्या दरवाजांमधून जर बाहेरची हवा रूममध्ये येत असेल तर रूम मधील तापमान थंड ठेवण्यासाठी एसी मधील यंत्रणेला अधिक काम करावे लागू शकते व बिल जास्त येते.
5- एसीचा टायमर लावणे– रात्री झोपण्यापूर्वी एसी ऑटो मोडवर ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच रूम पुरेशी थंड झाल्यावर तो आपोआप बंद होईल व टायमरचा उपयोग केल्याने कमीत कमी विजेचा वापर होतो. कारण रात्री उठून एसी बंद करण्यापेक्षा टायमर लावून झोपणे गरजेचे आहे.
तसेच दिवसभर एसी चालू ठेवण्यापेक्षा जर दिवसादेखील टायमर लावला तर ठराविक वेळेनंतर तो बंद होतो. अशा पद्धतीने एसी साठी टाईमरचा वापर केला तर विजेची बचत होते व एसीची कार्यक्षमता सुधारते.