अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :-शेतीच्या कामात नेहमीच साथ देणारा बैल हा शेतकऱ्यांचा हक्काचा साथीदार असतो. त्याच्या साहाय्याने बळीराजा शेतात सोने पिकवतो मात्र असाच हा सहकारी सोडून गेल्यानंतर बळीराजा देखील व्यथित होतो.

त्याच्या जाण्याने बळीराजाला देखील दुःख होते. असाच आपल्या लाडक्या बैलाचा मृत्य झाल्यानंतर एका शेतकऱ्याने बैलाचा दशक्रिया विधी नातेवाईकांच्या उपस्थितीत केला आहे.

पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी येथील हि घटना आहे. केशव मनाजी व्यवहारे असे या शेतकर्‍याचे नाव आहे. कष्टकर्‍याने बैलाची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणार्‍या बैलाचा शेवट गोड केलाय.

4 महिन्याचे वासरू ते 32 वर्षांचा सहवासात सोन्या बैल व्यवहारे कुटुंबाचा सदस्य बनला. दहा दिवसांपूर्वी सोन्याचा वृद्धापकाळाने व्यवहारे कुटुंबियांच्या दावणीला मृत्यू झाला.

यामुळे घरातील सदस्य गेल्या प्रमाणेच व्यव्हारे कुटुंबियांना दुःख झाले. त्यांनी दहा दिवसांचा दुखवटाही पाळला. सोन्याची कृतज्ञता व्यक्त करत माणसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पाडतात त्याच प्रमाणे सोन्या बैलाच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला.