Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. यावेळी मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अजूनही मुंबईत अनेक ठिकाणी संजय राऊत यांच्या सुटकेनंतर जल्लोष करण्यात येत आहे.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर मुंबईमध्ये मोठंमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे. पुढचे ३ दिवस शिवसेनेतर्फे मुंबईत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

श्रीमंत संजय राऊत यांचे स्वागत, तोफ धडाडणार अशा आशयाचे बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी वाघाच्या फोटोमध्ये संजय राऊत यांचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने मुंबई दणाणून निघाली आहे.

संजय राऊत यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर ते पहिल्यांदा त्यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी गेले आहेत. संजय राऊत अजूनही त्यांच्या निवास्थानीच आहेत. आज ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

संजय राऊत सर्वप्रथम रुग्णालयात जाणार आहेत त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत यांची जवळपास १०२ दिवसानंतर जेलमधून सुटका झाली आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. मात्र संजय राऊत यांची अटक बेकायदीशीर असल्याचे म्हणत कोर्टाने ईडीला चांगलेच फटकारले आहे. .