Maharashtra News:नवीन वाहन घेतल्यावर त्यासाठी पसंतीचा क्रमांक घेण्याकडे अनेक हौशी वाहनधारकांचा कल असतो. त्यामुळे आरटीओने अशा क्रमांकांसाठी शुल्क आकारण्यास सुरवात केली.

त्यातून कोट्यवधी रुपयांचा महसूल सरकारला मिळतो. आता सरकारने या शुल्कात मोठी वाढ केली आहे. यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून महिन्याभरात त्यानुसार शुल्क आकारणी सुरू होणार आहे.

या अधिसूचनेनुसार आता चारचाकी वाहनाला ‘०००१’ या क्रमांकासाठी पाच लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर पुणे, मुंबईसह राज्यातील नऊ शहरांमध्ये त्याच क्रमांकासाठीचा दर सहा लाख रुपये असणार आहे.

नव्या बदलांनुसार कोणत्याही चॉइस नंबरच्या वाटपासाठी किंवा त्याचा अर्ज ऑनलाइन परिवहन पोर्टलवर करता येणार आहे; तसेच या अधिसूचनेनुसार पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, रायगड, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये चारचाकी वाहन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला इतर शहरांच्या तुलनेत एक लाख रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

या नऊ शहरांव्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये चार चाकी वाहनांसाठी हे दर पाच लाख रुपये असे ठेवण्यात आलेले आहेत. घेतेला चॉइस क्रमांक सहा महिन्यांच्या आत केवळ नजीकच्या कुटुंबातील सदस्यांकडे यात पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी यांनाच हस्तांतर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.