file photo

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासनाने दि.8 पासून दि.14 ऑक्टोबरपर्यंत सात दिवस मिशन कवच कुंडल मोहीम राबविण्याचे नियोजन केले असून

या मोहिमेचा भाग म्हणून नगर शहरातही आगामी सात दिवस दररोज 21 हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

मनपाकडून आरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडा करण्यात आला असून, आरोग्य केंद्रांना लसीकरणाचे टार्गेट देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात हे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती महापौर सौ. रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

मिशन कवच कुंडलच्या नगर शहरातील नियोजनाबाबत महापालिकेत गुरुवारी (दि.7) बैठक पार पडली. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत राज्य सरकारने नगर शहर व जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

त्यानुसार कोरोना लसींचे डोस उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. महापालिकेने 8 ते 14 ऑक्टोबर या सात दिवसात सातही आरोग्य केंद्रांना दररोज 21 हजार डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहेत. त्यासाठी आगामी सात दिवस विविध 200 ठिकाणी लसीकरणाचे नियोजन मनपाकडून करण्यात आले आहे.

त्यासाठी कर्मचार्‍यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरात अद्याप 1 लाख 26 हजार नागरिकांचा पहिला डोस शिल्लक आहे.

या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने मनपाकडून नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुन आगामी सात दिवसात मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.