Ahmednagar News:आई वडील यांच्यानंतर आपण गुरुला आदराचे स्थान दिले आहे. आई वडील आपले जन्मदाते व गुरू म्हणजे भाग्यविधाते असे समजले जाते. परंतु याच पवित्र गुरु शिष्याच्या नात्याला कलंक लावण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

ग्रामीण भागातही मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्याने होत असल्याचे निदर्शनास येत असतानाच आता श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील इयत्ता ७ वीच्या वर्गातील विद्यार्थिनींची वर्गशिक्षकानेच छेडछाड करत त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला असल्याची चर्चा परिसरात आहे.

मुलींनी आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली असता पालकांनी या बाबत शाळेत जाऊन घटनेबाबत जाब विचारला असता शाळेचे अधिकारी हे स्थानिक असल्याने त्यांनी पालकांची समजूत काढत झालेल्या प्रकरणा बाबत दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणात संबंधित शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल करू नये यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पालकांवर दबाव आणला असल्याची देखील गावात तसेच परिसरात मोठी चर्चा असून या प्रकरणाने शाळकरी मुलींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

घटना घडल्या पासून संबंधित शिक्षक मागील १५ दिवसापासून शाळेवर विनापरवाना गैरहजर असल्याची माहिती शिक्षणं विभागाने दिली आहे. संबंधित शिक्षकावर चौकशी होऊन कडक कारवाईची मागणी केली जात आहे.