अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिर्डी शहराच्या भविष्याचा विचार करताना सर्व राजकीय मतभेद विसरून पदाधिकारी ग्रामस्थ एकत्र येतात. या गावाची विकास प्रक्रीयासुध्दा आशाच विचाराने झाली.

नगरपंचायतचे नगरपरीषदेत रुपांतर होण्याचा निर्णय देखील शिर्डीकरांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय आहे, शिर्डी शहराच्‍या भविष्‍यावरच सर्वांचे भवितव्‍य अवलंबून असल्‍याने सर्वांच्‍या संमतीने होणा-या निर्णयाबरोबर राहा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

या झालेल्या बैठकीत अर्ज दाखल न करण्याचा निर्णय सामुहीकतेने घेण्यात आला. शिर्डी नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्‍यानंतर भाजपचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, मनसे तसेच रासप अशा सर्वच पक्षांची एकत्रित बैठक संपन्‍न झाली.

या बैठकीस नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्‍यक्ष कैलास कोते, डॉ.एकनाथ गोंदकर, ज्ञानेश्‍वर गोंदकर, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, अशोकराव कोते, निलेश कोते, सचिन कोते, सचिन शिंदे, विजय कोते आदिंसह शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शिर्डी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्‍ये झाल्‍यानंतर शहराच्‍या विकासात झालेल्‍या बदलांची वाटचाल विस्‍तृतपणे आपल्‍या भाषणात विषद केली. शहरातील हा बदल होण्‍यास २१ वर्षांच्‍या कालावधी लागला. हा विकास साध्‍य करताना वैचारीक मतभेद जरूर झाले.

परंतू शिर्डी शहराचा प्रश्‍न ज्‍यावेळी निर्माण होतो त्‍यावेळी सर्वजण एकत्रित येतात हे दिसून आले. त्यावेळची भाविकांची संख्या आणी आजच्या संख्येत मोठा फरक आ‍ता दिसत असल्‍याकडे लक्ष वेधून बदलत्‍या शिर्डी शहराला आता अधिक निधीची गरज असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

महाराष्ट्रातील पहिले विमानतळ सुरू करण्यासाठी राज्य शासनाला पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, त्यावेळी अनेकांनी विमानतळास विरोध करत आंदोलने केली. परंतु हेच विमानतळ आता मुंबई, पुणे येथील विमानतळाप्रमाणे तिसरे सर्वाधिक वेगवान विमानतळ म्‍हणून ओळखले जावू लागले आहे.

समृद्धी महामार्गाबरोबर ग्रिन कोरीडोर, सुरत हैदराबाद महामार्ग, ४५० कोटी रुपये खर्च असलेल्या नगर मनमाड महामार्गाचे काम सुरू झाले असून हे सर्व शिर्डी शहरासाठी आता दळणवळणाची सुविधा उपलब्‍ध होत असल्‍याने या ठिकाणी रोजगार, संपत्ती वाढणार आहे.

त्याचा सकारात्मक दृष्टीने शिर्डी शहरावर परिणाम होईल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. उद्याच्या कालखंडात होणाऱ्या बदलाला सामोरे गेले पाहिजे म्‍हणूनच शिर्डी नगरपरीषद व्‍हावी म्‍हणून आपला पाठपुरावा सातत्‍याने होता, नगरविकास मंत्र्यांकडे याबाबत बैठकही झाली.

परंतू निर्णय करण्‍यासाठी शासनाकडून उशीर होत गेल्‍याने आपल्‍याला उच्‍च न्‍यायालयात जावे लागले. पण आता उशिरा का होईना शासनाने आज निर्णय केला ही बाब स्वागतार्ह आहे. आपली प्रतिष्ठा महत्वाची नसून शहराची प्रतिष्ठा महत्वाची आहे. समन्वयाची भावना ठेवावी,

चर्चतून मार्ग निघणार आहे, त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांत कोणीही फाँर्म भरू नये, निवडणुकीत सर्वपक्षीय बहिष्कारा संदर्भात झालेल्या निर्णयाचे कोणीही अंवेहलना करु नये असे आवाहन आ.विखे पाटील यांनी केले. मतदार याद्यांमध्‍ये आलेली दुबार नावे तसेच बोगस नावांच्‍या बाबतीत प्रांताधिका-यांशी बोलून यात सुधारणा करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

यावेळी प्रास्ताविक भाजपचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी केले.तर शिर्डी नगरपंचायतचे शिर्डी नगरपरीषद झाल्याने अँड अनिल शेजवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश कोते, शिवसेनेचे सचिन कोते, काँग्रेसचे डॉ एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते,

नगराध्यक्ष तथा याचिकाकर्ते शिवाजी गोंदकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून बहिष्काराला पाठिंबा दिला. ग्रामस्‍थांच्‍या वतीने आ.विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.