file photo

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  अनेक कालावधीपासून वादांकीत असलेला नगर – मनमाड (७५२-जी) महामार्ग हा प्रवाशांसाठी जीवघेणा बनला होता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नगर दौऱ्यात या महामार्गाचे पालकत्वच केंद्र सरकारने घेतल्याने आता या रस्त्याची समस्या लवकरच मिटणार आहे.

जीवघेणे खड्डे झालेला व अनेकांचा अपघात होणारा महामार्ग म्हणून नेहमी नाव घेतले जात असे. मात्र, महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय स्तरावर दखल घेत गडकरींनी ७५२-जी हा राज्याकडून केंद्राकडे वर्ग केला, असे सामान्यांचे मत आहे.

राज्य सरकार या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने जनतेला जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. नेहमी समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमे यातून नागरिक रस्त्याची दुरवस्था नजरेत आणून देत होते. तरीही राज्य शासन फारसे गंभीर नव्हते असेच दिसून आले.

यावर नितीन गडकरी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना धन्यवाद देत, कोल्हे व विखे यांनी जनतेच्या प्रश्नावर पाठपुरावा केला, याचे हे फलित असल्याचे नागरिक मत व्यक्त करत आहेत.

कोल्हे व विखे हे केंद्रीय भाजप व राज्य भाजप नेत्यांच्या मर्जीतील नेते आहेत. विकासाचे प्रश्न सुटण्यासाठी राज्य सरकार हे फारसे जागरूक नसल्याने पक्षीय पातळीवर आपल्या भागातील प्रश्न अनेकदा पोहोचण्याचे काम हे मान्यवर करतात.

खुद्द नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात स्नेहलता कोल्हे यांनी विकासकामांची मोठी यादी आपल्याला दिली, असा उजाळा देत खासदार विखेंच्या कामावरही समाधान व्यक्त केले.

यावरूनच आगामी काळात महत्त्वाचे असलेले विविध प्रलंबित प्रश्न निकाली निघतील, याचेच हे संकेत मानावे लागतील, असे कोल्हे यांनी सांगितले.