Ahmednagar News :- बनावट सोने घेऊन स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. एक जण पसार झाला आहे.

संजय हातण्या भोसले (वय 40 रा. वाघूंडे ता. पारनेर), कबीर उंबर्‍या काळे (वय 20), अक्षय उंबर्‍या काळे (वय 24 दोघे रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा) व सुरजकुमार ऊर्फ डब्ल्यूकुमार प्रभू ठाकूर (वय 25 रा. बेनसार जि. सिवान, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

नगर तालुका व बेलवंडी पोलिसांनी विसापूर फाटा ते मुंगूस गावाकडे जाणार्‍या रोडवर गुरूवारी रात्री ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींकडून अर्धा किलो बनावट सोने, दुचाकी, हत्यारे असा 32 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस अंमलदार इथापे, सोनवणे, घावटे, टकले, बोराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आरोपींनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन जबरी चोरी व बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडी गुन्ह्यांची कबूली दिली आहे. चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पारनेर, सुपा, बेलवंडी, घारगाव आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.