अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :-  पारनेर तालुक्यातील जवळे गावात काल संशयास्पद परस्थितीत मृतदेह आढलेल्या सोळा वर्षीय मुलीवर आज गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या मुलीची हत्या कोणत्या कारणास्तव झाली, तिच्यावर अत्याचार झाले का असे अनेक प्रश्न शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार असले तरी तिचा मृत्यू गुदमरून झाल्याचे प्राथमिक कारण सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

मात्र या घटनेने जवळे गावात संतापाचे वातावरण आहे, गावकऱ्यांनी आज संपूर्ण गाव बंद ठेवून गुन्हेगारांचा शोध लावा अशी मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परस्थिती हाताळत लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल असे आश्वासन दिल्या नंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी अवघा गाव उपस्थित होता. आ.निलेश लंके यांनी गुन्हेगारांचा तातडीने तपास लावून आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळे येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सोळा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही वर्षापासून या मुलीचे आई वडील जवळे येथे वास्तव्यास आहेत. मोलमजुरी करून ते आपला चरितार्थ चालवितात.

नेहमीप्रमाणे मुलीचे आई वडील सकाळी मोलमजुरीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ क्लास साठी निघून गेला. त्यानंतर या मुलीचा घात पात झाला असावा अशी शक्यता आहे.

मुलीच्या मृतदेहाजवळ एक चाकु तसेच टॉवेलच्या तुकड्याचा बोळा आढळून आल्याची माहिती पुढे आली असून चाकुचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्यातच तिचा मृत्यू झाला असावा असेही सांगण्यात आले.

मात्र त्यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मुलीवर अत्याचार झाले कि करण्याचा प्रयत्न झाला आहे हे आता पी एम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल.

ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे गावात संतापाचे वातावरण असून आज जवळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे.