अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सुमित मलिक यांच्या चौकशी आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साक्षीसाठी समन्स पाठविले आहे.

त्यानुसार पवार ५ व ६ मे रोजी आयोगासमोर प्रत्यक्ष हजर होऊन साक्ष नोंदविणार आहेत. आयोगाचे कामकाज मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहावर होणार आहे.

२०१७ मध्ये झालेल्या एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथे असलेल्या जयस्तंभाला १ जानेवारी २०१८ रोजी द्विशताब्दी वर्षानिमित्त मानवंदना देण्याचा कार्यक्रम होता.

त्या दिवशी स्थानिक व बाहेरच्या नागरिकांमध्ये दंगल उसळून प्रचंड जाळपोळ, लुटालूट, हिंसक घटना घडल्या. या घटनेत राहुल फटांगरे या स्थानिक तरुणाची हत्या झाली.

सुरवातीला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी व वडू बु येथील स्थानिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुणे शहर पोलिसांनी केलेल्या स्वतंत्र तपासात या प्रकरणाचा उलगडा होऊन शहरी नक्षलवादाचा हात उघड झाला.

यासंबंधी नियुक्त करण्यात आलल्या आयोगासमोर पवार यांनी शपथपत्र दाखल केले होते. त्यामध्ये आता त्यांची प्रत्यक्ष साक्ष आणि उलट तपासणी घेतली जाणार आहे.

यामध्ये ऍड. प्रशांत पाटील हे पवार यांचे वकील असून महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. शिशिर हिरे काम पाहत आहेत.

यावेळी पवार यांची उलटतपासणी सरकारी वकील ऍड. हिरे, एकबोटे यांचे वकील ऍड. नितीन प्रधान, विवेक विचारमंच पुणे यांचे वकील भाजप युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष ऍड. प्रदीप गावडे यांच्यासह संबंधित वकीलांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

सुरवातीला या घटनेमागे भाजपचा हात असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. मात्र, नंतर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख नाही. त्यामुळे आता प्रत्यक्ष साक्षीच्यावेळी पवार काय सांगणार याकडे लक्ष लागले आहे.