अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा जिल्ह्यातील वांबोरी रस्त्यावर अशीच एक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विकास संभाजी गडाख (रा.गडाख वस्ती, कुक्कडवेढे रोड वांबोरी) हा घराकडे जात असताना बिबट्या शेतामध्ये दबा धरून बसला होता.

बिबट्याने विकासला पाहताच त्याच्यावर झडप घेतली. यामध्ये तो गाडीवरून खाली पडला. दरम्यान घाबरलेल्या विकासने आरडाओरड करत हातवारे केले. त्यामुळे बिबट्या तिथून निघून गेला.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

हा प्रकार वनखात्याला कळविल्यावर त्यांनी पिंजरा घेऊन जा, पिंजरा गावातच आहे व त्या ठिकाणी ठेवून द्या, असे उत्तर दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या परिसरात हल्ले करून शेळ्या, कुत्रे फस्त करत आहे. दरम्यान पिंजरा मोकळा ठेवल्यामुळे त्यात बिबट्या जात नाही. शेतकर्‍यांनीच बिबट्यासाठी पिंजर्‍यामध्ये भक्ष ठेवावे, असे वनखात्याकडून सांगितले जाते.