अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा प्रकरणी वर्षभरात 30 ठिकाणी कारवाई करत 44 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 39 गावठी कट्टे, 58 जिवंत काडतुसे जप्त केली.(Ahmednagar Crime)

15 ते 30 हजार रुपयांमध्ये सहज उपलब्ध होणारा गावठी कट्टा फायर सेफ्टीच्यादृष्टीने अत्यंत घातक असताना त्याचा सुळसुळाट वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशात गावठी कट्ट्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. मध्यप्रदेशासह उत्तर प्रदेशातूनही नगर जिल्ह्यात गावठी कट्टे येतात.

यामध्ये खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट सक्रीय आहे. पोलिसांनी गावठी कट्टे पकडले असले तरी जिल्ह्यात येणार्‍या कट्ट्यांची साखळी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

मध्यप्रदेशात 10 ते 15 हजार रुपयांत मिळणारा गावठी कट्टा येथे 25 ते 30 हजार रुपयांत विकला जातो. गावठी कट्टे जिल्ह्यात येताना सीमेवर फारसा अडथळा येत नाही.

जिल्ह्यातील वाळू तस्कर, लुटमार करणारे सराईत गुन्हेगार यांच्यासह गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरूणांकडेही गावठी कट्टे मिळून येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये काही तरूणांनी तर गावठी कट्टे फक्त प्रतिष्ठेसाठी बाळगले असल्याची कबूली दिली आहे.