अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- अवैधरित्या खडी वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकार्‍यांच्या डोळ्यात लाल मिरची पुड टाकून शिवीगाळ, दमदाटी केली.

नगर तालुक्यातील कापुरवाडी ते वारूळवाडी रोडवरील बुर्‍हाणनगर हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. मंडलअधिकारी जीवन भानुदास सुतार हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी कापुरवाडीचे तलाठी गणेश दत्तात्रय जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे,

हनीफ हसिनभाई पठाण, हसिनभाई चाँद पठाण (दोघे रा. अमिरमळा, बुर्‍हाणनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि,

आरोपी हे त्यांच्या टेम्पोमधून परवाना नसताना अवैधरित्या खडी वाहतूक करत असल्याची माहिती मंडलअधिकारी, तलाठी यांना मिळाली होती.

ते कारवाईसाठी गेले असता आरोपींनी त्यांना अडवून मंडलअधिकारी सुतार यांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकली. या हल्ल्यात सुतार हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ हे करीत आहे.