file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- अनेक घोटाळ्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली नगर अर्बन बँक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोट्यवधींचे घोटाळे, बनावट सोनेतारण आदी घटनांमुळे बँकेकची प्रतिमा मलीन झाली आहे.

यातच आता बँके संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नगर अर्बन बँकेच्या पावणेतीन कोटी रुपयांच्या बनावट सोनेतारण प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 140 जणांचे जबाब घेण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी बँकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. दरम्यान नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. गेल्या दोन वर्षांपासून हा विषय चर्चेला गेला होता.

बँकेवर प्रशासक आल्यानंतर शेवगाव शाखेच्या बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाचा विषय पुढे आला. बँकेने लिलावाची प्रक्रिया सुरू केली, त्यावेळेला 364 पिशव्यांमध्ये बनावट सोने असल्याचे उघड झाले होते. बँकेने या संदर्भामध्ये शेवगाव पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर 160 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेवगाव येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे हा तपास वर्ग करण्यात आला होता. उपअधीक्षक सोनवणे व त्यांच्या पथकाने संबंधितांना नोटीस बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते.

त्यानुसार आतापर्यंत 140 जणांना जबाब देण्यात आलेले आहेत. या प्रकरणात अन्य काहीजणांची चौकशी बाकी आहे. बँकेचे काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा या चौकशीमध्ये येणार आहेत. त्यांच्याकडून त्या प्रकरणातील बरीचशी माहिती घ्यायची आहे.