Maharashtra News:नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकराजाच्या शिवपिंडीची पुन्हा झीज होऊ लागल्याचे दिसून येते आहे. यामुळे स्थानिक पातळीवर भाविक आणि पुरोहित वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

याचा पंचनामा करून अहवाल त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे आणि भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठविला आहे. शिवलिंगातील बह्मा, विष्णू, महेश असे तीन उंचवटे आहेत.

या उंचवट्यांवर असलेल्या दगडी कंगोऱ्याचे नुकसान होत असल्याचे दिसून आले.हजारो वर्षे प्राचीन असलेल्या शिवलिंगाची जलाभिषेकासाठीचे पाणी व इतर काही घटकांमुळे सन १९९० च्या दशकात झीज होत असल्याचे पहिल्यांदा लक्षात आले होते.

त्यानंतरही दूध, दही, मध, साखर अशा वस्तूंचा वापर सुरूच राहिल्याने पिंडीची झीज होत राहिली. पिशवीतील दूध शिवपिंडीवर ओतल्याने नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यावर दुधाचे अभिषेक थांबवले.

पूजा, साहित्य वाहण्यासही मनाई करण्यात आली. गर्भगृहात उतरलेल्या व्यक्तीने केवळ पाणी वाहण्याचा दंडक घालण्यात आला.सध्याच्या स्थितीत वज्रलेप बिनकामी ठरत असल्याचे लक्षात आले आहे.

त्यामुळे यापुढे नव्याने वज्रलेप लावणार की वेगळी काही उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवपिंडीवर जोरात व उंच अंतरावरून पाणी ओतणे थांबविण्याची गरज जाणकार व्यक्त करीत आहेत. गर्भगृहातील तापमान कमी ठेवणे, तसेच गर्भगृहातील दर्शनावर मर्यादा आणणे, अशा काही उपायांचीही चर्चा झडू लागली आहे.