अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-   जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावपातळीवर सावकारकीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरू लागले आहे. अनेकांचा जमिनी बळकावणे, पीडितांना धमकावून त्यांच्याकडून जादा पैसे लुबाडणे आदी घटनांमध्ये वाढ होऊ लागला होता.

मात्र आता खाकीच्या कारवायांमुळे सावकारकी करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यामुळे अवैध सावकारकीला चाप बसू लागला आहे.

नुकतेच जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील खासगी सावकाराच्या घरावर सहकार विभागाने गुरुवारी दि. ३० रोजी छापा टाकून खाजगी सावकारकी संदर्भात आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजगी सावकारकी संदर्भात जामखेड पोलिस स्टेशनला आठ दिवसांत तीन गुन्हे तर सहकार विभागाकडूनही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,असे एकुण आठ खाजगी सावकाराविरोधात आठ दिवसांत चार गुन्हे दाखल झाले आहेत.

यामुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. आणखी मोठे मासे गळाला कधी लागणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

दरम्यान जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या जाचात त्रस्त व पीडित नागरिकांनी स्वतः होऊन पुराव्या सह तक्रार द्यावी तक्रारीची दखल घेऊन खाजगी सावकाराविरोधात कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नगर दिग्विजय आहेर यांनी केले आहे.