Ahmednagar Crime : शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अत्यंत पवित्र, गुरू शिष्य याबाबत धार्मिक ग्रंथात देखील याबाबत उल्लेख आढळतो. परंतु अलीकडे या पवित्र नात्याला कलंक फासणाऱ्या घटना घडत आहेत.

नुकतीच एका महाविद्यालयात प्राध्यापकाने एका विद्यार्थीनीची छेड काढल्यामुळे संबंधीत विद्यार्थीनीच्या नातेवाईक व शहरातील काही तरुणांनी त्या प्राध्यापकाची चांगलीच धुलाई केली.

हा प्रकार शेवगावात घडला. संबंधीत प्राध्यापकाने या अगोदरही अनेक विद्यार्थींनींची छेड काढली होती. मात्र बदनामीच्या भितीने तसेच पालक आपले शिक्षण बंद करतील या भीतीने विद्यार्थीनी पुढे येत नव्हत्या.

तर महाविद्यालयीन पातळीवरच असे प्रकरण दडपले जात होते. मात्र या प्राध्यापकांच्या कृष्णलिलांचा अतिरेक झाल्यामुळे संबंधीत विद्यार्थीनीने आपल्या नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला.

त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट महाविद्यालयात येवून संबंधित प्राध्यापकास याबाबत जाब विचारला. मात्र त्याने अरेरावीची भाषा वापरल्याने नातेवाईक व तरुणांनी त्याची चांगलीच धुलाई केली.

दरम्यान पोलिसांनी या प्राध्यापकास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते. परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची फिर्याद दाखल करण्यात आली नाही त्यामुळे या प्राध्यापकास सोडून दिले.