अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  अज्ञात चोरटयांनी एस.टी. चालक विजय खुपसे यांना तलवारीचा धाक दाखवत घरातील ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील बीड रोडलगतच्या शिक्षक कॉलनी येथे घडली आहे.(Theft)

याबाबत बसचालक विजय नवनाथ खुपसे (रा . शिक्षक कॉलनी, जामखेड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ अज्ञात दरोडेखोरांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, खुपसे हे रात्री घरात झोपलेले असताना दि २७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात ५ दरोडेखोरांनी त्यांच्या स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

फिर्यादीस तलवारीचा धाक दाखवून घरातील बेडरुममध्ये जाऊन कपाट तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.

यानुसार बसचालक विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ अज्ञात दरोडेखोरांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.