file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मागील वर्षीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये नगर जिल्ह्यातील ५ जणांनी यश मिळवले आहे.

यामध्ये विनायक नरवडे (रँक ३७), सुहास गाडे (रँक ३४९), सुरज गुंजाळ (रँक ३५३), अभिषेक दुधाळ (रँक ४६९), विकास पालवे (रँक ५८७) हे यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे नगरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.

विनायक नरवडे : विनायक हा नगर येथील सावेडीतील असून, त्याने पुणे येथून अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण घेऊन काही काळ अमेरिकेत नोकरीही केली. परंतु आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे नौकरी सोडून यूपीएससीचा अभ्यास केला व विनायकने देशात ३७ वी रँक पटकावली आहे.

सुहास गाडे : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील सुहासने प्राथमिक शिक्षण चापडगाव येथून, माध्यमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातून, तर नांदेड येथून कॉम्प्युटर सायन्सची पदवी मिळविली. सूरजने पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळविले.

सूरज गुंजाळ : सूरजने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. मागील दोन वर्षांपासून तो केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील नगर एमआयडीसीतील एका कंपनीत कर्मचारी आहेत, तर आई गृहिणी आहे.

अभिषेक दुधाळ : अभिषेकने युपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. अभिषेक हा बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील असून, त्याला ४६९ वी रँक मिळाली आहे. अभिषेकचे वडील दिलीप दुधाळ हे शिक्षक, तर आई संगीता गृहिणी आहेत.

विकास पालवे : विकास हा मूळ सोनई (ता. नेवासा) येथील असून, त्याने ५८७ वी रँक मिळवली. गेल्या चार वर्षांपासून तो युपीएससीची तयारी करीत होता. त्याचे वडील बाळासाहेब पालवे हे शिक्षक, तर आई शोभा या गृहिणी आहेत.