नोकरी करता करता शिक्षण घेण्याची आणि नोकरीत आणखी प्रगती करण्याची विद्यार्थ्यांच्या तयारी असते. मात्र, अशी सोय उपलब्ध असतेच असे नाही. आता मात्र राज्य सरकारनेच यासाठी पुढाकार घेतला आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत राज्य सरकारने करार केला आहे. त्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेबरोबर ‘मिलाप’ या योजनेचा सामंजस्य करार करण्यात आला.

यामध्ये वर्षांत किमान १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यांना त्यांच्या कौशल्य विकासाच्या आधारावर नोकरी करता करता वेगवेगळय़ा क्षेत्रातील शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आहे.

त्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून संबंधित विषयातील पदविका व पदवी प्रमाणपत्रही मिळेल. राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने यापूर्वी सुरू केलेल्या ‘मिलाप’ या योजनेद्वारे बारावीत गणितात उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी उच्च शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

यासाठी आतापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी असून या योजनेंतर्गत चालू वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील योजनेत कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू केली जाणार आहे.