अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-   बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू पावलेल्या शेळीचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळ नसल्याचे सांगत संबंधित शेतकऱ्याला मृत शेळीचे शवविच्छेदन करण्यासाठी ती शेळी पंचायत समिती येथे आणण्यास सांगितल्याचा प्रकार श्रीगोंदा येथे घडला आहे.

त्यामुळे शेतकऱ्याने बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली शेळी थेट श्रीगोंदा पंचायत समिती येथे आणल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील मदनेवाडी परिसरातील दत्तु कुशाबा कोळेकर यांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेळीचा काल सकाळी मृत्यू झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करत पुढील कारवाईसाठी शेळीचे शवविच्छेदन करण्यास सांगितले असता.

कोळेकर यांनी काष्टी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यास याबाबत कळविले असता. त्यांनी आज वेळ नसल्याचे सांगत मृत्यू शेळीला श्रीगोंदा येथे घेऊन येण्यास सांगितले.

तसेच संध्याकाळी ६ वाजेच्या आत शेळीला श्रीगोंदा येथे नाही आले तर शवविच्छेदन करणार नसल्याचे सांगितल्याने त्या शेतकऱ्याने मृत्यू पावलेल्या शेळीला आपल्या खाजगी जीप मध्ये टाकून श्रीगोंदा पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय कार्यालयात आणले. या घटनेमुळे श्रीगोंदा पंचायत समिती एकच खळबळ उडाली.