The water bill should be levied at domestic rate and not at commercial rate

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- गोदावरी कालव्यातून कोपरगाव शहराला देण्यात येणारी पाण्याची पट्टी व्यावसायिक दराने न आकारता घरगुती दराने आकारण्यात यावी यासाठी पाटबंधारे अधिकार्‍यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही साठवण तलावांना पाटबंधारे विभाग गोदावरीच्या डाव्या कालव्यातून पाणी देण्यात येते.

या पाण्याची पाणीपट्टी वर्षानुवर्षापासून व्यावसायिक दराने आकारली जात आहे. त्यामुळे पालिकेवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे.

यासाठी पाटबंधारे अधिकार्‍यांसमवेत आमदार काळे यांनी नुकतीच बैठक घेतली. लवकरच या चार साठवण तलावांच्या जोडीला पाच नंबर साठवण तलावाची भर पडणार आहे.

त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेवर अधिक बोजा पडू नये यासाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी घरगुती दराने आकारली जावी अशी मागणी होत होती.

या बैठकीत पाणीपट्टी घरगुती दराने आकारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.