अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- नेवासा शहर व परिसरात अवैध मटका राजरोसपणे चालू आहे. खुलेआम मोक्याच्या ठिकाणी चालणार्‍या या मटक्यामुळे शाळकरी अनेक मुले या मटक्याच्या आकडेमोडीत गुंतत चालले आहेत.

विशेष बाब म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अतंरावर तसेच शहरातील असणार्‍या चौका- चौकांत मटका तेजीत असताना पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असले तरी सामान्य नागरिक मात्र हैराण झाले आहेत.

नेवासा येथील बसस्थानक, नगरपंचायत कार्यालय परिसर, बाजारातळ, पोस्ट ऑफिस, गणपती मंदिर, आशा टॉकीज, नेवासा श्रीरामपूर मुख्य रस्ता, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड अशा विविध ठिकाणी मटक्याच्या टपर्‍यांवर गर्दी पाहायला मिळते आहे.

या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू असतो मटक्याच्या पैशामुळे चौकात दारुड्यांचे आपाआपसात होणारे वाद व शिवीगाळ तर नित्याचीच बाब बनली आहे. मात्र पोलीस प्रशासनाची कारवाई केवळ फार्स ठरली असून पुन्हा काही दिवसातच या मटका बुकीने जोर धरला आहे.

पोलिसांना सर्वकाही दिसत असूनही जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. पोलीस मटका घेणार्‍या मटक्याच्या दुकानांवर छापे टाकतात व तेथील पंटरवर गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया पार करून त्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मटका चालवणारे आता बिनधास्तपणे खुलेआम व्यवसाय करत आहेत.

या व्यावसायीकांशी अनेक मध्यस्थी करून या अवैध व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या अवैध व्यवसायाला खतपाणी घालणार्‍यांची देखील चौकशीची मागणी जोर धरत आहे.