file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात शेतकर्‍यांच्या पांढरं सोनं असलेल्या कापसाला चांगला भाव मिळत असताना एक मोठे संकट बळीराजासमोर उभे राहिले आहे.

शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिसकावण्याचे काम सध्या परिसरातील भुरटे चोर करत असल्याची चर्चा सुरू आहे. यंदा कापसाची मोठ्याप्रमाणात चोरी होत आहे.

मात्र चोरांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने शेतकरी याबाबत तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे चोरटे गावातही चोर्‍या करू लागले असल्याने नागरिकांबरोबर व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील किराणा दुकान फोडून सामानाची चोरी केली होती. त्याचबरोबर शेळ्यांच्या चोर्‍या झाल्या.

तर नुकतेच सलाबतपूर गावात आलेल्या ऊसतोड कामगारांच्या कोप्यातून मध्यरात्री रोख रक्कम, सोनं, मोबाईल तसेच मुलाबाळांना खाण्यासाठी आणलेल्या वस्तुंसह किराणा मालाची नासधुस केली आहे.

भुरट्या चोर्‍याच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रमाणामुळे शेतकरी व्यापार्‍यांसह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आसून पोलिसांनी भुरट्या चोरांना धडा शिकवावा, अशी मागणी होऊ लागली आहे.