Ahmednagar News:अहमदनगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे डेप्युटी आरटीओ बद्दल महत्वाची बातमी आहे. राज्यातील १५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयांत म्हणजेच आरटीओ मध्ये करण्यात येणार आहे.

त्यामध्ये अहमदनगरचा समावेश आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला परिवहन विभागाने मंजुरी दिली असून तो आता वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

अहमदनगरच्या या कार्यालयाचा दर्जा उंचावल्यानंतर महत्वाच्या आणि धोरणात्मक निर्णयांसाठी नागरिकांना नाशिकवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

शिवाय नगरला आरटीओ झाल्यास श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयाप्रमाणे दक्षिण भागात आणखी एखादे उपप्रादेशिक कार्यालयही भविष्यात होऊ शकते.

अहमदनगरचे कार्यालय अलीकडेच नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे यासाठी वेगळा खर्च करण्याचीही गरज पडणार नाही.

परिवहन विभागाने राज्यातील सर्व कार्यालयांचा आकृतीबंध नव्याने तयार केला आहे. त्यामध्ये या पंधरा कार्यालयांचा दर्जा उंचावण्याचा सनावेश आहे.

सोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येतही बदल होणार आहे. ऑनलाइन सेवा वाढल्याने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या कमी होणार असून नव्या कार्यालयांमुळे अधिकाऱ्यांची संख्या काहीशी वाढणार आहे.

सध्या नगर जिल्हा नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येतो. नगर आणि श्रीरामपूर ही दोन्ही कार्यालये नाशिकला जोडली आहेत.

अहमदनगरला प्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यास येथे वरिष्ठ अधिकारी येतील, श्रीरामपूरही नगरला जोडले जाईल. यामुळे नागरिकांना कामासाठी नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही.