अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : गेल्या ३० वर्षांपासून आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये शेती आणि शिवारासंबंधीचे वाद आणि त्यावरून निर्माण होणारे तंटे गावातच मिटविण्यात येत होते.

मात्र, यावेळी ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्याने अन्य गावांप्रमाणेच तेथील वातावरण बदलले आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही तंटे तंटामुक्ती समितीसमोर थेट न आणता आधी पोलिस ठाण्यात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता सुमारे तीस वर्षांनंतर गावकऱ्यांना अशा तंट्यांसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागणार आहे. महाराष्ट्र दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली आहे.

या गावात शिवार वाहतुकीचे रस्ते, बांध व जमिनीचे पोटहिस्से यावरून निर्माण होणारे तंटे गेली ३० वर्षापासून गावपातळीवर मिटवले जात होते.

परंतु गेल्या वर्षी प्रथमत ३५ वर्षांनंतर हिवरे बाजार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आहे. त्यामुळे तंट्यांना राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

म्हणून यासंबंधी आधी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. नंतर दोन्ही पक्षांना वाटले तर ते पुन्हा गावातील तंटामुक्ती समितीकडे येऊन आपसांत तडजोड करू शकतात, असे ठरविण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या राजकारणामुळे गावाच्या विकासावर होणारे परिमाण आता हिवरे बाजारमध्येही दिसू लागले आहेत, असे यावरून दिसून येते