अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- ऊसाची पूर्ण रास्त व किफायतशीर रक्कम (एफआरपी) न देणार्‍या राज्यातील 43 साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना नाकारण्यात आला आहे.

संबंधित कारखान्यांनी दिवाळीपर्यंत एफआरपी न दिल्यास त्यानंतर व्याजासह एफआरपी वसूल करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.

राज्यात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या गाळप हंगामाला दसर्‍याच्या मुहूर्तावर (15 ऑक्टोबर) सुरुवात झाली. यंदा 194 कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली.

आतापर्यंत 54 कारखान्यांत गाळप सुरू झाले आहे. मात्र 43 कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.

शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्यानं परवाने रोखण्यात आले आहे. ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही.

या 43 साखर कारखान्यांनी मिळून शेतकर्‍यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांचे पैसे दिले जाणार नाहीत, तोवर गाळप परवाना मिळणार नसल्याचं साखर आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

परवाना रोखण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये भाजपच्या नेत्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना शेतकर्‍यांचे पैसे देणार नाहीत तोपर्यंत परवाना दिला जाणार नाही. असे आदेश साखर आयुक्त यांनी दिला आहे.