Supriya Sule : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपशब्द वापरत खालच्या पातळीत टीका केल्याने राज्याचे राजकारण तबल्याचे दिसत आहे. अनेक स्तरातून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तर यांचे पुतळे देखील जाळले आहेत.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या या विधानावरून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे दिसत आहे.

सुप्रिया सुळे या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नांदेड येथे सहभागी झाल्या आहेत. यावेळी पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजितदादा वैयक्तिक सुट्टी वर आहेत. त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली तर चर्चा होते. हा माझ्या भावावर अन्याय आहे असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाला यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या, माझी राऊतांशी भेट झाली नाही. पण सत्याचा विजय झाला आहे.

सत्यमेव जयते. राऊत यांना जसा न्याय मिळाला. तसा अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनाही न्याय मिळावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, माझा न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे. कालची ऑर्डर आली. त्याचे मी अभिनंदन करोत. एक सहकारी इतका संघर्ष करून तुरुंगातून आला आहे.

त्याची आई, मुलं आणि कुटुंबीयांना सर्वांनाच त्रास झाला. पण अशावेळी कुटुंबाचा कुणी विचार करत नाही. आता कुणावर अन्याय करू नका. सत्ता येते आणि जात असते. ही वैचारिक लढाई आहे. ती त्याच पातळीवर लढली पाहिजे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला आहे, कोणतीही यात्रा कधीच कुणाच्या विरोधात नसते. आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत.

लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उद्देश या यात्रेचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नातं आहे. मी आणि राहुल गांधी संसदेत एकत्र बेंचवर बसतो.