file photo

Ahmednagar News : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राजकीय संर्घष पेटलेला असताना नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र शिवसेनेवर टीका न करण्याचा व शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे.

पारनेर तालुक्यात एका युवा नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते.आपल्या विजयात नगर जिल्ह्याच्या शिवसेनेचा पन्नास टक्के वाटा आहे, त्यामुळे आपण शिवसेनेसोबत राहणार आहोत.

त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले.

मला त्याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल.

असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल. माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो’, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.