अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील पथदिवे नादुरूस्त व बंद पडलेले आहेत. त्यात आता सणासुदीच्या काळात चोरटे दहशत माजवत अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी, चेन स्नॅचिंग सारख्या घटना घडवून आणत आहेत.

मात्र अद्यापही पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे. यामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळीचा सण शहरातील नागरिकांना अंधारात साजरा करावा लागतोय कि काय ? असा आता प्रश्न पडला आहे.

तर दुसरीकडे मनपा शहरात एलईडीचे दिवे कधी सुरु होणार याकडे नगरकरांचे डोळे लागले आहेत. नगर शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

दरम्यान नगर शहरात एकूण 25 हजार पथदिवे आहेत. परंतु यातील काही पथदिव्यांच्या लाईट मटेरियलअभावी बंद पडलेल्या आहेत. तसेच याचा देखभालीचा खर्च महापालिकेला परवडत नाही, असे चित्र आहे.

मनपाकडून ठेकेदार शोधण्याचे काम सुरु आहे, पहिल्या वेळेस ठेकेदार मिळाला, परंतु तांत्रिकद़ृष्ट्या त्यांचे टेंडर रद्द केले. नंतर पुन्हा आता दोन ठेकेदारांनी टेंडर भरले असून

त्यातील एका ठेकेदाराचे टेंडर पास झालेले आहे. परंतु त्या ठेकेदाराकडून शहरात प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार याकडे नगरकरांच्या नजरा आहेत.