file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील करोना लसीकरण 100 टक्के पुर्ण होण्यासाठी दारोदार जाऊन कोविड लसीकरण करण्याचा शुभारंभ तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांच्या उपस्थितीत झाला.

सोमवारी लक्ष्मीवाडी परिसरात घरोघर जाऊन लसीकरण करण्यात आले. लसीकरणास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला असून विशेष म्हणजे अदिवासी बांधवांनी प्रथमच चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी श्रीरामपूर येथील कटलरी माल घरोघरी जावून विक्री करीत असलेल्या शेख या विक्रेत्याला दुसरा डोस देण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी सांगितले की, जे लस घेणार नाहीत, त्यांचे रेशन बंद करण्यात येईल.

तसेच इतर सुविधा बंद करण्यात येतील. ग्रामपंचायत दाखले, तलाठी दाखले दिले जाणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली नाही, त्यांनी तातडीने लस घ्यावी व ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांनी दुसरा डोस घेवून देशाला करोनामुक्त करण्यासाठी हातभार लावावा.

सरपंच अर्चना रणनवरे व उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी, आपल्या घरातील व आजूबाजूच्या सर्वांनी करोनाला हरवण्यासाठी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे व गावाला करोनामुक्त करावे, असे आवाहन केले. तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून लसीकरणाचा आढावा घेतला.

तसेच त्यांनी लस घेतलेल्या लोकांनाच किराणा सामान देण्याबाबत सर्व दुकानदारांना सुचना केल्या. ज्यांचे लसिकरण पुर्ण झालेले असेल त्या नागरीकांनाच रेशन द्यावे, अशी सुचनाही त्यांनी रेशन दुकानदारांना केली.