Rohit Pawar : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर १०२ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही एक वाघाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. संजय राऊतसोबतच न्यायालयाने प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑगस्टमध्ये अटक केली होती.

संजय राऊत यांना जामीन मिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनीही संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचे स्वागत केले आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवर १२ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये वाघ पिंजऱ्यातून बाहेर येताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओला रोहित पवार यांनी सत्यमेव जयते असे कॅप्शनही दिले आहे. रोहित पवार यांनी हे ट्विट शिवसेना आणि संजय राऊत यांना टॅग देखील केले आहे.

रोहित पवार बोलताना म्हणाले की, तुमची बाजू कशी मांडता यावर जामीन मिळतो. राऊत 100 दिवसांपासून जामिनासाठी संघर्ष करत होते. आज त्यांना न्याय मिळाला. राऊत मीडियासमोर आपली बाजू नेहमीच जोरदारपणे मांडली होती. त्यामुळे मी हटके ट्विट केले आहे.

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचाही रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले, मंत्र्याने अहंकारातून महिलेवर टीका केली.

या मंत्र्याला एवढा अहंकार असेल तर सरकारला किती अहंकार असेल हे दिसून येतं. या सरकारमधील अनेक नेत्यांनी महिलांच्या विरोधात अनेकदा विधाने केली आहे. त्यांच्या अहंकारातून ही विधाने आली आहेत असेही पवार म्हणाले.

पुढे बोलताना ते रोहित पवार म्हणाले, या कृषी मंत्र्यांनी अहंकारातून खालच्या पातळीवर जाऊन विधान केले. त्यामुळे त्यांचा राजीनामा या सरकारने घेतला पाहिजे. पण हे सरकार राजीनामा घेणार नाही, कारण हे सरकार अहंकाराने भरलेले आहे.