अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- तालुक्यातील राजापूर येथे सावकाराच्या छळाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

या संदर्भात मयताच्या पत्नी आशा अण्णासाहेब नवले यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत आशा नवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजापूर येथील रहिवासी अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय 43) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

मयत नवले यांनी आरोपी सुदाम दुधे (रा. नेहरू चौक) व बालकिसन (पूर्ण नाव माहित नाही राहणार देवाचा मळा) यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते.

मयत नवले यांनी व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयेच्या बदल्यात सावकारांना दीड लाख रुपये दिले होते. आरोपींना दीड लाख रुपये देऊनही ते आणखी व्याज मागत होते.

सावकारांनी नवले यांना पैशाच्या मागणीसाठी वेळोवेळी त्रास दिला असून, या छळाला कंटाळून नवले यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याबाबत मयत नवले यांच्या पत्नी आशा नवले यांनी आरोपी सुदाम दुधे व बालकिसन यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे करीत आहे.