अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- छत्तीसगडच्या सुकमात केंद्रीय राखीव पुलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका मनोरुग्ण जवानाने आपल्याच चार सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

सोमवार पहाटे ३:५० च्या सुमारास झालेल्या या घटनेत दोन जवानांचा घटनास्थळीच तर उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. आणखी दोन जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या लिंगनपल्ली गावातील छावणीत ही घटना घडली. हे गाव राजधानी रायपूरपासून सुमारे ४०० किमीवर आहे.

बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. म्हणाले की, गोळीबारात एकूण ७ जवान जखमी झाले होते. पैकी राजमणीकुमार यादव, राजीब मंडल, धनजी आणि धर्मेंद्रकुमार यांचे निधन झाले.

ते बिहारचे रहिवासी होते. मरईगुडा पोलिस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. तेथील प्रभारी सुनील शर्मा यांनी सांगितले की, आरोपी जवान रितेश याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पाेलिसांच्या ताब्यात आहे.