अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील दोन गावातील चौघे अहमदनगर शहरात दुचाकींची चोरी करत होते. कोतवाली पोलिसांनी त्यांची माहिती काढून त्यांना अटक केली.

त्यांनी चार दुचाकीसह दाळमंडई येथील दुर्गा देवी मंदिरात चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली. शुभम बबन भापकर (वय 21 रा. गुंडेगाव ता. नगर), कृष्णा बाबासाहेब गुंड (वय 25 रा. मेहेरबाबा वेशी जवळ आरणगाव ता. नगर), अभिषेक संतोष खाकाळ (वय 20 रा. संभाजीनगर, व्हीआरडीई गेट आरणगाव), जालींदर अर्जुन आमले (वय 21 रा. आमले मळा, आरणगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या चौघांकडून पोलिसांनी चार चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत

मोमिन तस्दीक मोमिन इद्रीस (वय 19 रा. मुकुंदनगर) यांची दुचाकी शनी चौकात भोला जिम जवळून चोरीला गेली होती. याप्रकरणी इद्रीस यांना कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरच्या गुन्ह्यासह इतर चोरीच्या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू असताना वरील चार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली.

सदरचे आरोपी कायनेटीक चौकात येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाने कायनेटीक चौकात सापळा लावून वरील चौघांना अटक केली.