अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :-   छेडछाड करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी विकास शामसुंदर गायकवाड व आकाश शामसुंदर गायकवाड (रा. नागापूर, एमआयडीसी) या दोघा भावांवर एका विधवा महिलेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी (दि.18 ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला.

नागापूर गावठाण येथे घरा शेजारी राहणार्‍या विधवा महिलेस विकास श्यामसुंदर गायकवाड व आकाश श्यामसुंदर गायकवाड या बंधूंनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याबद्दल एमआयडीसी पोलिस स्टेशनला शुक्रवार दि.8 ऑक्टोबर रोजी सदर गायकवाड बंधूंवर मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी कलम 323, 504, 506 अन्वये सदर महिलेने गुन्हा दाखल केला होता.

मात्र सदर आरोपीने महिलेची छेडछाड करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असताना आरोपींवर कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने, सदर महिलेने आरोपींवर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे करुन उपोषणाचा इशारा दिला होता.

याची दखल घेऊन सदर आरोपींवर सोमवारी कलम 354 प्रमाणे छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी येथील सन फार्मा चौक येथे विकास गायकवाड याने फिर्यादी महिलेची छेड काढली.

हा प्रकार आरोपींच्या घरच्यांना सांगण्यासाठी महिला घरी गेली असता, तेथे असलेल्या विकास व आकाश गायकवाड यांनी तिला शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच गळ्यातील सोन्याच्या मणक्याची पोत तोडून नुकसान केले. हा प्रकार त्यांचा मोठा बंधू अंतोन गायकवाड याला सांगितला.

तो लहान भावांना समजावून सांगण्यासाठी आला असता, दोन्ही भावांनी मोठा भाऊ अंतोन यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.