Udayanraje Bhosale : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी २०२४ च्या आत छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार असल्याची घोषणा केली आहे. आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही जगदंबा तलवारीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

उदयनराजे भोसले यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे असे वक्तव्य केले आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

तसेच प्रतापगडावरील अफझल खानाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली यावरही उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. तसेच या गोष्टीच राजकारण करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं की जगदंबा तलवार राज्यात आणली जावी. टॉवर ऑफ लंडनमध्ये सध्या ती ठेवली गेली आहे.

तिथली सिक्युरीटी मी जाऊन जातीने बघितली आहे. आता डिप्लोमसी म्हणून मोठ्या मनाने बिट्रिश सरकारने त्या त्या देशाला त्यांच्या त्यांच्या ऐतिहासिक ठेवी दिल्या पाहिजेत.

यावेळी बोलताना अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पडले याविषयीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मान सन्मानाच्या बाबतीत कधीच कुणाला कमी केलं नाही.

आपल्यावर हल्ला करणाऱ्याची कबर बांधण्याचा विचार दुसऱ्या कुणीही केला नसता. पण महाराजांचे विचार मोठे होते. जो विचार कुणीच केला नसता, तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला.

या कबरीजवळील बेकायदा बांधकाम काढलं गेलंच पाहिजे. ही कबर नेमकी कशाकरता आहे, त्यामागचा इतिहास काय आहे, हे आताच्या पिढीला कळलं पाहिजे, असेही भोसले यांनी म्हटलं आहे.