Maharashtra News:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.

सध्या सुरू असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असल्याने ते नेमके काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट यांच्यातील पक्ष चिन्हाच्या वादावर निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले तर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई केली आहे.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री येथे शिवसेना नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना आगामी रणनीतीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता ते थेट जनतेशीच संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले आहे.