file photo

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  राज्यातील अधिकाधिक गावे कोरोना संसर्गापासून दूर राहावीत, यासाठी सरपंचासह सर्वच गाव पुढाऱ्यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून

आपापल्या गावाला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी गावांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्याच्या ग्रामविकास विभागाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर केली आहे.

या कोरोनामुक्त गाव स्पर्धेत विभागात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला १५ लाख तर,

तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

आपणच आपले कुटुंब, गल्ली, वाडी-वस्ती, गाव कोरोनामुक्त केले तर, आपला तालुका, जिल्हा आणि राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. यामुळे गावेची गावे कोरोनामुक्त होणे आवश्‍यक आहे.

यासाठी गावांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही स्पर्धा सुरु केली आहे. यामुळे गावे कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करतील. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये गावा-गावात स्पर्धा निर्माण व्हावी आणि या स्पर्धेतून गावेची गावे कोरोनामुक्त व्हावीत.

शिवाय यासाठी त्यांच्या पाठीवर बक्षीसाच्या माध्यमातून कौतुकाची थाप मारल्यास, गावांच्या विकासासाठी वेगळा निधीही उपलब्ध होऊ शकेल, असा तिहेरी उद्देश राज्य सरकारने या स्पर्धेमागे ठेवला आहे.

स्पर्धेत सहभागासाठीच्या अटी

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी १० जानेवारी ते १५ मार्च २०२२ असा स्पर्धा कालावधी असेल

स्पर्धा कालावधीत केलेल्या कामांचेच मूल्यांकन केले जाणार

स्पर्धेत भाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींना १५ मार्चपर्यंत स्वमूल्यांकन करावे लागेल

स्वमूल्यांकनाचे प्रस्ताव १५ मार्चअखेर गट विकास अधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य

ग्रामपंचायतींच्या स्वमूल्यांकनाची २० मार्चपर्यंत गट विकास अधिकारी तपासणी करणार

तपासणीतील गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे पहिल्या गावांची यादी होणार

जिल्ह्यातील गावांची झेडपीचे सिईओ तपासणी करून गुणानुक्रमे पहिली तीन गावे निवडणार

सीईओ जिल्ह्यातील गुणानुक्रमे पहिल्या तीन गावांची नावे विभागीय आयुक्तांना पाठविणार